CoronaVirus News: सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:56 AM2020-06-18T04:56:37+5:302020-06-18T06:50:30+5:30
१८ सप्टेंबरपर्यंत पुढे; राज्यात दोन लाख सहकारी संस्था
मुंबई : कोरोनाचा संकटकाळ असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यासाठी म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
यादी सहकार विभागाने १८ मार्च रोजी एक आदेश काढून तीन महिन्यासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या; ती मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे
आता आणखी तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्या वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका आजच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात निवडणुका पुढे करण्याचे अधिकार सहकारी संस्था अधिनियमानुसार राज्य शासनाला आहेत.
राज्यात एकूण २ लाख सहकारी संस्था आहेत. त्यातील निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झालेल्या तसेच ज्यांची निवडणूक या काळात व्हावयाची आहे त्यांना ही मुदतवाढ मिळेल. २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये तर २००१ ते ८ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २ हजार रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.
सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन; २२ कोटी जमा
सरपंचांचे काही महिन्यांच्या प्रलंबित मानधनापोटी त्यांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
उपसरपंचांनाही मिळणार मानधन
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले आहे. त्यापोटी पहिल्या टप्प्यात एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन (१५.७२ कोटी) जमा करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.