Unlock: दिवाळीपर्यंत संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे ठरेल; मुंबईत धोका वाढला, आयएमएचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:58 AM2020-10-12T01:58:47+5:302020-10-12T06:59:14+5:30
Coronavirus, Unlock News:महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असून मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले.
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असा सावधगिरीचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असून मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत आणखी कमी झाला तर दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकतील, असेही टोपे यांनी म्हटले होते. टोपे यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत डॉ. भोंडवे यांनी सांगितले की, कोरोनाबाबत कोणतेही अनुमान काढण्याइतपत सध्याची परिस्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीतून दिसत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे ठरेल. उलट अधिक काळजी घ्यावी लागेल,असेही डॉ. भोंडवे यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंबईत धोका वाढला : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख २७ हजार २७६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना मुंबईत मात्र रोज २,२०० ते २,८०० नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत ९,३९१ रुग्णांचे मृत्यू झाले असून रुग्णालयाधीन म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २५,३५८ एवढी झाली आहे.