coronavirus: मजुरांच्या जत्थ्यांमुळे महामार्गावर कोंडी, एसटीसोबतच मिळेल त्या वाहनांनी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:15 AM2020-05-11T06:15:01+5:302020-05-11T06:18:46+5:30
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.
ठाणे/ मुंबई : मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशला जाता यावे म्हणून राज्याची सीमा गाठण्यासाठी मजुरांची धावपळ सुरू असून अशा मजुरांचे जत्थेच्या जत्थे नाशिकमार्गे निघाल्याने कसारा घाटात रविवारी दिवसभर वाहनांची कोंडी झाली होती.
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जत्थे मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. कुणी ट्रक, टेम्पोने, कुणी सायकलने, तर काही जण चक्की पायीच निघाले आहेत.
राज्य सरकारकडून होणाऱ्या वाहन व्यवस्थेची वाट न पाहता मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातील बहुतांश मजूर एकत्र येत मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत सायकलींवरून १५ हजारांपेक्षा जास्त मजूर गावी गेल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण कांबळे यांनी व्यक्त केला. वाहन न मिळाल्याने पायी जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पायी जाणाºयांना दोन दिवसांत नाशिक येथून ७९ बसेसने पुढे सोडण्यात आले. शनिवारी ४२ आणि रविवारी ३७ बसेस नाशिक येथून सोडल्याचे सेवानिवृत्त प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंड यांचा हवाला देत सांगितले. या बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडणार आहेत. मुंबईतून बहुतांश मजूर बाहेर पडल्याने दहिसर, मुलुंड चेकनाक्यावर शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी गर्दी होती.
मोफत प्रवास मजुरांसाठीच
लॉकडाउनमध्ये राज्यातील विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी एसटी महामंडळाकडून ११ मेपासून मोफत बस सुरू करण्यात येत आहेत. ही सुविधा केवळ विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांसाठीच आहे. - वृत्त/२
५७२ भारतीय मुंबईत दाखल
परदेशात अडकलेले ५७२ भारतीय रविवारी मुंबईत दाखल झाले. लंडनहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी मध्यरात्री दीड वाजता ३२९, तर सिंंगापूर येथून दुपारी साडेबाराला आलेल्या विमानातून २४३ प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. - वृत्त/२