Coronavirus: ‘पॉझिटिव्ह’ शीख यात्रेकरूंवरून वाद; पंजाबच्या आरोपाचे महाराष्ट्राकडून खंडन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:46 IST2020-05-03T00:48:47+5:302020-05-03T06:46:22+5:30
नांदेडहून गेलेले २१५ जण पॉझिटिव्ह

Coronavirus: ‘पॉझिटिव्ह’ शीख यात्रेकरूंवरून वाद; पंजाबच्या आरोपाचे महाराष्ट्राकडून खंडन
चंदीगड/मुंबई : नांदेडहून पंजाबला परत पाठविलेल्या शीख यात्रेकरूंपैकी २१५ यात्रेकरू तेथे पोहोचल्यानंतर कोरोना चाचणी केली असता ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यावरून पंजाब व महाराष्ट्रात शनिवारी थोडा वाद झाला. महाराष्ट्राने या यात्रेकरूंना कोरोनाची चाचणी न करताच परत पाठविल्याचा आरोप करून पंजाबने नाराजी व्यक्त केली, तर महाराष्ट्राने या आरोपाचा ठामपणे इन्कार केला.
नांदेड येथील तख्त हुजूरसाहीबला आलेले सुमारे ४,००० यात्रेकरू ‘लॉकडाऊन’मुळे गेले ४० दिवस तेथेच अडकून पडले होते. त्यांची सचखंडसाहीब व लंगरसाहीब गुरुद्वारांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यांत बसने परत पाठविण्याची केंद्राने परवानगी दिल्यानंतर यापैकी बऱ्याच यात्रेकरूंना पंजाबला पाठविण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यापैकी २१५जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यावरून हा वाद झाला. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या यात्रेकरूंना परत पाठविताना त्यांची चाचणीही न करता पाठविल्याबद्दल पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी नाराजी व निषेध व्यक्त करणारे पत्र महाराष्ट्राला पाठविले. महाराष्ट्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने पंजाबच्या या आरोपाचे खंडन केले. हा अधिकारी म्हणाला की, हे यात्रेकरू बसमध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत याची खात्री करूनच त्यांना पाठविण्यात आले होते.
उत्तर प्रदेश सरकारने पाठविलेल्या बसने झांशीमार्गे महाराष्ट्रातून परत आलेल्या स्थलांतरित मजुरांपैकी सात जण तेथे पोहोचल्यानंतर कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याचे बस्तीच्या जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
‘हा तर बदनामीचा कट’
तबलिगी जमातनंतर शीख समुदायाला बदनाम करण्याचा कट असल्याची टीका अकाल तख्तचे हरप्रीत सिंग यांनी केली आहे. महाराष्ट्रातून पंजाबमध्ये परत गेलेल्या भाविकांमधील काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिखांची सर्वोच्च संस्था जथेदारने याची तुलना आता मुस्लिम समुदायाच्या तबलिगी जमातशी केली आहे. हा मोठा कट असल्याचा आरोपही शीख समुदायाच्या या नेत्यांनी केला आहे.