coronavirus: राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी पोहोचला २६ दिवसांवर, पण या गोष्टीने वाढवली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 09:35 PM2020-06-18T21:35:17+5:302020-06-18T21:59:02+5:30
राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आता हळूहळू सुधरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणार कालावधी आता २६ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण मात्र अद्याप कायम आहे. आज राज्यात कोरोनाचे ३ हजार ७५२ नवे रुग्ण सापडले असून, राज्यात आज दिवसभरात १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार ५०४ झाली असून, आतापर्यंत ५ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६० हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
''राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
Maharashtra records highest single-day spike with 3752 new #COVID19 cases today, total number of cases stands at 1,20,504. Death toll rises to 5,751 after 100 deaths were reported today. 60,838 patients have been discharged so far including 1672 today: State Health Department
— ANI (@ANI) June 18, 2020
राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा १). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.