Coronavirus: संकटकाळात ८८ लाख महिला, बालकांची दोन महिने सोय; महिला व बालविकास विभागाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:51 AM2020-05-05T02:51:41+5:302020-05-05T02:52:40+5:30
अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे.
यदु जोशी
मुंबई : राज्यातील तब्बल ८८ लाख शहरी आणि ग्रामीण मुले व गर्भवती तसेच स्तनदा मातांना दोन महिने पुरेल इतक्या खाण्यासाठीच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत महिला व बालविकास विभागाने कोरोनाच्या संकटकाळात धावून जाण्याचे काम केले आहे.
सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची बालके, गर्भवती व स्तनदा माता तसेच अतिकुपोषित बालके अशा ५० लाख, तर अंगणवाड्यांमधील तीन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या ३८ लाख बालकांना हा पुरवठा केला जात आहे. त्यात हरभरा डाळ, तेल, हळद, मिरची, मीठ आणि गहू यांचा समावेश आहे.
अंगणवाड्यांमधील बालकांना या वस्तूंव्यतिरिक्त तांदूळदेखील दिला जात आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना एका जेवणात ५०० कॅलरी व १२ प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, तर महिलांना ६०० कॅलरी आणि १८ ते २० प्रोटीन दर किलोमागे द्यावेत, असे निकष आहेत. दोन महिने पुरतील एवढ्या वस्तू एका किटमध्ये दिल्या जात असून पुरवठादार प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे किट पोहोचवतात आणि तेथून महिला व इतर कुटुंबीयांना त्या दिल्या जातात. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जाते. सूत्रांनी सांगितले की, पुरवठादारांना तब्बल ४०० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या पुरवठादारांचा समावेश आहे.
लॉकडाउनचा काळ आणि त्यातही कमी दिवस हाती असताना आमच्या यंत्रणेने प्रचंड नियोजन करून ८८ लाख माता-बालकांपर्यंत पोहोचण्याचा विडा उचलला. पुरवठा प्रक्रियेचे मॉनिटरिंग नियमित केले जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मी विशेष आभार मानते. - यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकास
पोषण आहार घरपोच
सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना आधीपासूनच घरपोच पुरवठा केला जात होता. मात्र, आता त्यात ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. ही बालके अंगणवाड्यांमध्ये यायची आणि त्यांना शिजवलेले अन्न पुरवण्यात यायचे. मात्र, लॉकडाउनच्या काळात अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे त्यांनाही महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पूरक पोषण आहार थेट घरापर्यंत पोहोचविला जात आहे.