Coronavirus: राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी चिंताजनक; वयोवृद्धांपेक्षा ‘या’ वयोगटात सर्वाधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:25 AM2020-03-27T10:25:22+5:302020-03-27T10:27:27+5:30
महाराष्ट्रात कोरोना रुग्णावर मेडिकल एज्युकेशन अँन्ड ड्रग्स विभागाने अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार यात १२२ रुग्णांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
मुंबई – कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत चालली असून आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद असणार आहेत.
केरळपाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात १३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. साधारणपणे हा आजार बालकांना आणि वयोवृद्ध लोकांना होत असल्याचं दिसून येतं. पण महाराष्ट्रात कोरोनाचे शिकार झालेल्यांमध्ये सर्वाधिक युवा वर्गाचा समावेश आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये ३१ ते ५० वयोगटातील रुग्ण अधिक आहेत. तर ३१ ते ४० वयातील लोकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णावर मेडिकल एज्युकेशन अँन्ड ड्रग्स विभागाने अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार यात १२२ रुग्णांचा समाविष्ट करण्यात आला आहे. यामधील ३३ रुग्णांचे वय ३१ ते ४० वयोगटातील आहे. तर २१-३० आणि ४१-५० वयोगटातील रुग्णांची संख्या प्रत्येकी २४ इतकी आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील संख्या १० आहे.
राज्यात एकूण आढळलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के लोक परदेश दौरा करुन आले होते. राज्यात ६९ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. १२२ रुग्णांपैकी ५४ टक्के लोक परदेशातून मायदेशी परतलेले आहेत. सध्या भारत कोरोनोच्या गंभीर स्तरावर आहे. सध्या देशात ७२४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यातील ६६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आठव्या आठवड्यात हा व्हायरस झपाट्याने पसरत जातो.
राज्यातील आताची आकडेवारी पाहता कम्यूनिटी ट्रान्समिशन अद्याप झालं नाही. मात्र सरकारने जास्तीत जास्त तपासणी करण्यावर भर दिला आहे. मुंबई महापालिकेनेही हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. ज्यामध्ये कॉल करुन तपासणीसाठी सांगू शकतात. खासगी लॅबमध्येही टेस्टिंग करता येत आहे. पण लोकांना त्यासाठी ४ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत.