Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:27 PM2022-06-06T21:27:47+5:302022-06-06T21:28:22+5:30
Ashadhi Wari 2022: अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये अचानक राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारही अलर्ट झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यावर्षी पंढरपूरची आषाढी वारी कुठल्याही निर्बंधांविना होणार, अशी घोषणा झाली होती. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी सध्याच्या घडीला पंढरपूरची आषाढी वारी ही कुठल्याही निर्बंधांविना आणि अडचणींविना होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मला असं वाटतं की. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलंय. पण के सगळं करत असताना दिंडीमध्ये १०-१५ लाख लोक जमणार आहेत. या परिस्थितीत आता काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
वारीवर काही बंधनं नसतील का असं विचारलं असता राजेश टोपे यांनी सांगितले की, आता वारीवर काही बंधनं असावीत का अशी चर्चा झाली. मात्र वारीबाबतची तयारी खूप पुढे गेलेली आहे आहे. की त्याबाबत चर्चा जरूर झाली की एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्यास कसं होईल. मात्र आपण खूप पुढे गेलोय. त्यामागे लोकांच्या भावनाही आहेत. त्यामुळे वारी होईल. त्यावर कुठलीही बंधने अडचण येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, पालघर अशा काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असून, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.