coronavirus : संचारबंदी मोडली, राज्यातील विविध भागात भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:35 AM2020-03-24T10:35:55+5:302020-03-24T10:36:05+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत आज सकाळी अनेकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली
ठाणे - सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत आज सकाळी अनेकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. ठाणे, अहमदनगर, नवी मुंबई येथे खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. तर गोव्यातही मासेखरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती.
ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळी मार्केट मध्ये सकाळपासून ठाणेकरांनी गर्दी करून संचार बंदीचा भंग केला. ही गर्दी पाहता पोलिसांनी विक्रेत्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत भाजी विकण्याची सूचना केली आहे. जर ग्राहक मास्क न घालता भाजी खरेदीला आहे त्यांना पोलिसांनी फटकावले आहे. तसेच जे ग्राहक मास्क न घालता भाजी खरेदीला येतील त्यांना विक्रेत्यांनी भाजीच विकू नये अशा सक्त सूचना ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. सोमवंशी यांनी सांगितले. लोकांना वाटत भाजी मिळणार नाही या भीतीने त्यांनी मार्केट मध्ये गर्दी केली आहे. परंतु वाशी मार्केट बंद झाल्यावर हे मार्केट देखील बंद ठेवले जाणार असे सोमवंशी म्हणाले. कोरोना संदर्भात पुरेशी काळजी न घेणाऱ्या ग्राहकांना सकाळीच पोलिसांचे दंडुके खावे लागले.
आज सकाळपासूनच नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांसोबत सर्वसामान्य ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तिकडे गोव्यामध्ये आज मासेखरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.