CoronaVirus: दहावीचा शेवटचा पेपर कधी?; शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:53 PM2020-03-27T22:53:05+5:302020-03-27T22:53:55+5:30
नववी आणि अकरावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय १५ एप्रिलनंतर होणार
मुंबई: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता थेट 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
याचसोबत राज्यातील नववी आणि अकरावीच्या परिक्षा संदर्भातही 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येणार होता मात्र या बाबतीतही आता 15 एप्रिलनंतरच निर्णय घेण्यात येईल असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुढील वर्षी दहावी आणि बारावीला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थी परीक्षा कधी देणार आणि पुढील वर्षीच्या अभ्यासाला सुरुवात कधी करणार या चिंतेने पालक अनेक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित तेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी 15 एप्रिलनंतर शिक्षण विभाग या परीक्षासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे आता त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव व संचारबंदीमुळे सध्या बरेचसे शिक्षक गावी गेले आहेत. तर अनेक शिक्षकांना घराच्या बाहेर लांबचा प्रवास करणे अशक्यच आहे. यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाता येतील असे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.