CoronaVirus : दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:19+5:30
मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली, तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात साेमवारी दिवसभरात ३७ हजार ३२६ रुग्ण आणि ५४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्याही पुढे गेले हाेती. दिवसभरात ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ रुग्ण उपचाऱाधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९६ लाख ३१हजार १२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या मुंबईत ४५ हजार ५३४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ८९१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १६ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ५१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ४६ रुग्ण पुरुष आणि २८ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते, तर ४४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत दिवसभरात २३ हजार ०६१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने आत्तापर्यंत चाचण्यांची संख्या ५७ लाख ३३ हजार ४३१ वर पोहोचली आहे. ३ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४१ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १६३ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झोन ८७ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ४९३ इतक्या आहेत.
राज्यात एकूण ५१ लाख ३८ हजार ९७३ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ७६ हजार ३९८ आहे. शनिवारी आणि रविवारी कोरोना चाचण्या कमी झाल्याने वाढीचे नेमके प्रमाण किती आहे, हे येत्या एक -दोन दिवसात स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.