coronavirus: "देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना न होवो" गुलाबराव पाटील यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:01 PM2020-07-17T13:01:13+5:302020-07-17T17:21:34+5:30
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जळगाव येथे केली.
जळगाव - देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जळगाव येथे केली. जनतेच्या काळजीमुळे राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगत फडणवीस यांनी माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना, 'गिरीश, मला या दौऱ्यात कोरोना झाला तर शासकीय रुग्णालयातच दाखल करावे', असे व्यक्तव्य केले होते. त्यावर पाटील यांनी जळगावात भाष्य केले. यासोबतच राज्यात सत्ता आणणे म्हणजे बैलजोडी घेण्यासारखे आहे का ? असा टोला लागावत राज्यात सत्ता आणण्याचे स्वप्नही विरोधकांनी पाहू नये, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नियोजित पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आदेश येत्या बुधवारपर्यंतप्राप्त होतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्यावरील कोरोना संकट अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. अनेक राजकीय नेत्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नेते कोरोनावर मात करून परतले आहेत. या संकट काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरे करत असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनाचा धोका असूनही फडणवीस यांचे दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या फोनची सध्या सर्वत्र सुरू आहे.
'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.