CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस क्वारंटिन व्हावं लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:46 PM2020-08-04T15:46:47+5:302020-08-04T16:44:56+5:30
CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस होम क्वारंटिन व्हावं लागणार आहे. १२ ऑगस्टच्या आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. तर त्यानंतर कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांना स्वॅब चाचणी बंधनकारक असेल. राज्य सरकारनं याबद्दलचे निर्देश दिले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. एसटीनं चाकरमान्यांसाठी ३ हजार गाड्या सज्ज ठेवल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्यांना ई-पास काढावा लागेल. एसटीनं जाणाऱ्यांना ई-पासची गरज भासणार नाही. एसटी हाच त्या प्रवाशांसाठी ई-पास असेल अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. २२ जणांनी मिळून एसटीचं ग्रुप बुकिंग केल्यास प्रवाशांना एसटी थेट त्यांच्या गावात सोडेल. त्यांना जेवण एसटीमध्येच करावं लागेल, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.
प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एका एसटी बसमधून २२ जणच प्रवास करू शकतात. खासगी बसेससाठीदेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू आहे. त्यामुळे अनेक खासगी बस वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दरानं तिकीट विक्री करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस एसटीपेक्षा दीडपटच अधिक भाडं आकारू शकतात, अशी सूचना सरकारनं केली आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बस वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सवासाठी एसटीनं गावी जायचं असल्यास आज संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येईल. १२ ऑगस्टच्या आधी गावी गेल्यास तिथे १० दिवस होम क्वारंटिन व्हावं लागेल. १२ ऑगस्टनंतर जायचं असल्यास स्वॅब टेस्ट बंधनकारक असेल. त्यामुळे १२ ऑगस्टच्या आधी गावी इच्छिणाऱ्यांच्या हाती जेमतेम आठ दिवस राहिलेत. त्यामुळे एसटी बुकिंगसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. मात्र सर्व्हर डाऊन किंवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, अशी खात्री सतेज पाटील यांनी दिली. ३ हजार बसेस कोकणात जाण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी किती जण बुकिंग करतील, याचा अंदाज घेऊन आम्ही बँकएंड तयार ठेवलं आहे. त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.