CoronaVirus राज्यात ३० लाख लीटर दूध वितरणाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:46 AM2020-04-07T05:46:47+5:302020-04-07T05:47:09+5:30
‘लॉकडाउन’चा परिणाम : सरकारने मनावर घेतल्यास नुकसान टाळणे शक्य
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संकलनास फारशा अडचणी नसल्या तरी वितरणास येत असलेल्या अडचणींमुळे राज्यात सध्या रोज किमान ३० लाख लीटर दूध वितरण होत नाही. त्याचा फटका दूध संघांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.
राज्यभरात दुधाला प्रचंड मागणी आहे. कारण लोक घरी बसून आहेत व त्यांना चहासह दुधाची गरज आहे. भाजीपाला विकता आला नाही तर तो मातीत घालावा लागतो, परंतु दुधाचे तसे नाही. या उद्योगाला प्रक्रिया उद्योगाचे पाठबळ आहे. त्यामुळे संकलन झालेले दूध शिल्लक राहिले तर त्यापासून पावडर करता येते. सध्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) प्रतिदिन ३ लाख लिटर दुधाची पावडर करीत आहे. ‘गोकुळ’कडे सोमवारपासून राज्य शासनाकडून २ लाख लिटर दूध पावडर करण्यासाठी पुरवले जात आहे. अन्य तीन संघांनाही हे दूध पुरविण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात खासगी दूध संघांकडे पावडर प्लान्ट जास्त आहेत व त्यांनी ते बंद ठेवले आहेत. त्यांनी संकलनच बंद ठेवले आहे. ‘महानंदा’कडे स्वत:ची पावडर करायची काही यंत्रणा नाही. जो होता तो ३० टन क्षमतेचा प्लान्ट त्यांनी खासगी उद्योगाला चालवायला दिला आहे. शासनाचा मिरज येथे २० लाख टन व उदगीर (जि. लातूर) येथे ११ लाख टनांची क्षमता असलेला पावडर प्लान्ट आहे; परंतु हे दोन्ही प्लान्ट बंद आहेत. त्यामुळे शासन आता शेतकऱ्यांकडून घेणार असलेले १० लाख लिटर दूध पावडर करण्यासाठी सहकारी दूध संघांकडे पाठविण्याची वेळ आली आहे.
वितरण कमी का झाले?
चहा टपरी बंद, मिठाई उद्योग बंद, किराणा दुकान, शॉपीज्मधील विक्री थांबली, वितरण करणारी बिहार, उत्तर प्रदेशातील मुले गावी गेली. (मुख्यत: मुंबईत)
दूध खरेदी दरातही फटका
म्हशीच्या दुधाला मागणी आहे व गोकुळच त्याचा पुरवठा करणारा मुख्य संघ असल्याने दुधाच्या खरेदी दरात कपात करण्यात आलेली नाही. परंतु गाईच्या दुधात लिटरला ५ रुपये दर कमी दिला जात आहे. गोकुळने २ रुपये कपात केली आहे. दर कमी करूनही अनेक सहकारी व खासगी संघही शेतकºयांचे दूध स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.