CoronaVirus सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करावी; सुभाष देसाईंची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:27 PM2020-04-13T15:27:43+5:302020-04-13T15:28:06+5:30
एका चॅनलच्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे समुहाच्या सुमारे ६ जणांना कोरोनाची बाधा झाली.
मुंबई : मुंबईतील एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री आदींसह आरोग्य अधिकारी या पत्रकारांच्या संपर्कात येत असल्याने सर्वच सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.
एका चॅनलच्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे समुहाच्या सुमारे ६ जणांना कोरोनाची बाधा झाली. वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी रात्रंदिन बातम्या प्रसारणाचे काम करीत आहेत. त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ सांभाळून काम करावे. त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत जेणेकरुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे देसाई यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांना त्यांनी चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.