Coronavirus : राज्यसरकार 'कोरोना'च्या बाबतीत सतर्क; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:05 PM2020-03-03T16:05:30+5:302020-03-03T16:05:48+5:30
Coronavirus : महाराष्ट्राच्या जनतेने घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून, अफवांवर विश्वास ठेवू नका.
मुंबई : दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यातच आता आग्र्यात देखील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झालं असल्याची सॅम्पल टेस्टमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र राज्यसरकार 'कोरोना'च्या बाबतीत सतर्क असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती देताना टोपे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून, अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच मासाहारी खाऊ नका किंवा इतर अफवा पसरवल्या जात असून, हे खोटं आहे. मात्र आपण सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे असे टोपे म्हणाले.
तर कोरोना'च्या बाबतीत राज्यसरकार सतर्क असून, लक्ष ठेवून असल्याचं सुद्धा टोपे म्हणाले. तसेच या आजाराबाबत राज्यात अफवा पसरवणाऱ्या समाज कंटकांचा सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून शोध घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले.