Coronavirus : गर्दी करू नका, अनावश्यक प्रवास टाळा; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:59 PM2020-03-16T18:59:25+5:302020-03-16T19:15:45+5:30
Coronavirus : 'राज्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे'
मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्या उपस्थित सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "राज्यासाठी पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत. पुढील संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये गर्दी होऊ देऊ नका. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी".
कोरोनाचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव आहे. जग मंदीच्या फेऱ्यात असताना कोरोनाचे संकट आलेले आहे. आर्थिक फटका बसणार असेल तर काय उपाययोजना करता येईल, हे सुद्धा यावेळी पाहण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, राज्यातील कोणत्याही शहरांना लॉकडाऊन करणार नाही किंवा पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच, हॉटेल बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. काही हॉटेलमध्ये विलगीकरणाची सोय करण्याचा विचार सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याचबरोबर, परदेशातून जे काही लोक आले होते. त्यांची तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारकडून जी यादी देण्यात आली होती. त्यानुसार चाचणी केली जात आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय-
१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.
२. ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवणार.
३. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असा 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
४. क्वॉरेंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.
५. ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल.
६. केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
७. आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचा जिल्हा प्रशासनाला अधिकार.
८. उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
९. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.
१०. होम क्वॉरेंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
११. धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.