CoronaVirus News: राज्यातल्या जनतेसाठी पुढे या; कोरोनातून बऱ्या झालेल्या हजारो जणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:26 PM2020-06-28T14:26:58+5:302020-06-28T14:31:17+5:30
मुख्यमंत्र्यांचा राज्यातल्या जनतेशी संवाद; लॉकडाऊन उठणार नसल्याचे स्पष्ट संकेत
मुंबई: राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून जगात सुरू असलेल्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिशन बिगनची सुरुवात केली आहे. मात्र शक्य असल्यास घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
कोरोना संकटाचा सामना करताना अनेक नवनव्या औषधांची नावं पुढे येत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर अशा औषधांचा वापर जगभरात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नाही. कोरोना रुग्णांसाठी सध्या जगभरात प्लाज्मा पद्धती वापरण्यात येत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं ९० टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
https://www.facebook.com/lokmat/videos/2537623293123603/
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगभरात प्लाज्मा उपचार पद्धतीचा वापर होत आहे. राज्यातही सध्या या पद्धतीचा अतिशय व्यापकपणे वापर सुरू आहे. कदाचित महाराष्ट्र प्लाज्मा पद्धतीचा सर्वाधिक वापर करणारं राज्य ठरेल. मात्र यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याचप्रकारे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.