coronavirus : स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 01:34 PM2020-03-23T13:34:07+5:302020-03-23T13:49:29+5:30
मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
मुंबई - राज्या आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील बेजबाबदार नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे.
"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला होता.
"लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले होते.