coronavirus : चिंता करू नका, राज्याकडे सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:51 PM2020-03-24T16:51:55+5:302020-03-24T16:53:55+5:30
अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत. तसेच भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत. तसेच भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांनी अन्नधान्याची चिंता करू नये. भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
अन्नधान्य, भाजीपाला ही अत्यावश्यक बाब आहे त्यामुळे त्याच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही. तसेच बाजार समित्याही बंद पडणार नाहीत. पोलिसांनी माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांना समजून घ्यावे, मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडायची गरज नाही. एका व्यक्तीने जाऊन खरेदी करून यावी, तसेच बाजारातही गर्दी करू नये, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, चिकन, मटण, मासे यांच्या विक्रीसही परवानगी आहे. त्यामुळे त्यखवरही बंधने येणार नाहीत. मात्र सर्वांनी तारतम्य बाळगावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.