Coronavirus: दारोदारी जाऊन 'त्यांनी' घेतला रुग्णांचा शोध; नेटाने लढून तालुका केला कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 07:38 AM2021-10-09T07:38:37+5:302021-10-09T07:39:08+5:30
डाॅ. दीपा कुळकर्णी: लसीकरणातही अग्रेसर जिल्ह्यात लसीकरणातही कळमेश्वर तालुका अग्रेसर आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९२ टक्के इतके आहे.
नागपूर : काेराेना महामारीचा काळ हा आराेग्य सेवकांसाठी खूप माेठे आव्हान हाेते. प्रशासकीय सेवेतील आराेग्य अधिकाऱ्यांनी शासकीय कर्तव्य आणि नागरिकांची सुरक्षा या दाेन्ही जबाबदाऱ्या अतिशय नेटाने पार पाडल्या. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका काेराेनामुक्त करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. दीपा कुळकर्णी हे नाव त्यापैकीच एक. कर्तव्य पार पाडत असताना त्या स्वत:ही कोरोनाग्रस्त झाल्या. त्याचवेळी पतीलाही कोरोना झाला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही. कोरोनावर मात करून त्या पुन्हा कामाला लागल्या आणि आपला तालुका कोरोनामुक्त केला.
कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वीच शासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार अधिकारी तयारीत होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण सापडला. पहिल्या लाटेच्यावेळी सर्वच नवीन होते. ग्रामीण भागात तर मोठी गंभीर स्थिती होती. सुविधाही नव्हत्या. नवीन रुग्ण सापडला, तर त्याला समाजाकडूनच बहिष्कृत केले जात होते. घरी रुग्ण सापडला, तर कुणी पुढे व्हायला तयार होत नव्हते. अशावेळी रुग्णाला शोधून काढणे, त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या कुटुंबीयांची समजून काढून त्यांनाही तपासणीसाठी तयार करणे, तसेच उपचारासाठी त्याला भरती करून घेणे, यासोबतच गावातील लोकांचे व समाजाचेही मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे ही सर्व कामे त्यांनी पार पाडली. लसीकरणातही अग्रेसर जिल्ह्यात लसीकरणातही कळमेश्वर तालुका अग्रेसर आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९२ टक्के इतके आहे.
आधी सनस्ट्रोक, मग गाठले कोरोनाने
पहिल्या लाटेत काम करीत असतानाच डाॅ. कुळकर्णी यांना सनस्ट्रोक झाला. आजारपणातही त्यांनी जबाबदारी नेटाने सांभाळली. दुसरी लाट अधिक तीव्र होती. ऑक्सिजन, बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. कळमेश्वरमध्येही भयावह स्थिती होती. आरोग्य अधिकारी म्हणून डाॅ. कुळकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. यात त्या स्वत: कोरोनाग्रस्त बनल्या होत्या. त्यांचे पतीही कोरोनाच्या विळख्यात सापडले. पती-पत्नी दाेघेही एकाचवेळी कोरोनाग्रस्त होते. घरी एकटा मुलगा, अशा कठीण प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. कोरोनातून बरे होऊन त्या पुन्हा जोमाने कामाला लागल्या आणि अखेर कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त करून दाखविला.