coronavirus: ई-पास रद्द; आंतरजिल्हा प्रवास खुला, खासगी बससेवा सुरू; मुंबई मेट्रो, लोकल, रेस्टॉरंट मात्र बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:26 AM2020-09-01T06:26:08+5:302020-09-01T06:26:17+5:30
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.
मुंबई : पुनश्च हरिओमच्या पुढच्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना राज्य शासनाने लॉज आणि हॉटेल १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, इतर रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द करण्यात आला असून खासगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.
शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, सर्व प्रकारचे रेस्टॉरन्ट, जिम बंद असतील पण रेस्टॉरन्टमधून पार्सलसेवा पूर्वीप्रमाणेच सुरू असेल. आधी ३३ टक्के उपस्थितीने लॉज आणि हॉटेल (लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता सोशल डिस्टंन्सिगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत १०० टक्के क्षमतेने ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
खासगी कार्यालयांमध्ये आतापर्यंत १० कर्मचारी वा १० टक्के कर्मचारी यापैकी जास्त असलेल्या संख्येने कर्मचारी उपस्थितीची मुभा होती. आता ती ३० टक्के कर्मचारी वा ३० कर्मचारी अशी असेल.
धार्मिक स्थळे बंदच राहणार
धार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलने सुरू असली तरी ती तूर्त बंदच ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन या बाबत येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
काय सुरू होणार
लॉज आणि हॉटेल
जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी
यापुढे ई-पासची गरज नाही
खासगी बस, मिनी बस
-आंतरराष्टÑीय विमान प्रवास
(गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार)
रिक्षामध्ये चालकासह
दोन तर चारचाकीमध्ये चालकासह तीन प्रवाशांना मुभा
काय बंद राहणार
रेस्टॉरंट आणि बार,
नाट्य आणि सिनेमागृह,
जिम, स्विमिंग पूल
लोकल, मेट्रो, रेल्वेसेवा बंद
शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे
सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
कोणत्याही अटीशिवाय दुसºया जिल्ह्यात जाता येणार
आजच्या निर्णयामुळे आंतरजिल्हा वाहतुकीवरील
सर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता
कोणत्याही अटीशिवाय एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाता येईल.
सरकारी कार्यालयांतील उपस्थितीबाबत नवे नियम
सरकारी कार्यालयांमध्ये वर्ग-१ आणि २ चे अधिकारी १०० टक्के उपस्थित राहतील. मात्र, वर्ग-३ आणि ४ चे ५० कर्मचारी वा ५० टक्के कर्मचारी यापैकी जी जास्त असेल, त्या संख्येने उपस्थित राहतील. मुंबईसह एमएमआर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी- चिंचवडच्या पीएमआर क्षेत्रात सरकारी कार्यालयांमधील वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के असेल, पण वर्ग-३ आणि ४ चे कर्मचारी हे ३० टक्के वा ३० यापेक्षा जास्त असलेल्या संख्येने उपस्थित राहतील.