Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:31 AM2020-03-21T06:31:41+5:302020-03-21T06:31:46+5:30

सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. शासकीय आदेश न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Coronavirus : effort in state to control Corona | Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Next

मुंबई : कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावली असून सर्व जिल्ह्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. शासकीय आदेश न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दुबईहून गोवळकोटरोड (रत्नागिरी) येथे आलेल्या तरुणाची तपासणी केल्यानंतर त्याला एकांतवासाची सूचना केली होती. मात्र शुक्रवारी सकाळी तो गायब झाला.

मंगल कार्यालय मालकांविरुद्ध गुन्हा
गंगाखेड (परभणी) : जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून १९ मार्चला विवाह सोहळा पार पाडणाºया दोन मंगल कार्यालय मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ समर्थ व ओम साई मंगल कार्यालयाच्या मालकांनी मंगल कार्यालय सुरू ठेवून तेथे विवाह सोहळा पार पाडला होता.

पुण्यात बाधितांची संख्या २१ वर
पुणे : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून, २४ तासांमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. बारा दिवसांत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ वर पोहोचली असून, पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. पुण्यात आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण स्कॉटलंड येथून १९ मार्चला मुंबई विमानतळावर आला होता. शुक्रवारी पहाटे या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
तेथून तो पुण्यात आल्यावर रात्री उशीरा नायडू रुग्णालयामध्ये दाखल झाला. या वेळी त्यांच्यासोबत आई-वडील आणि घरातील नोकर यांना देखील नायडू रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

जळगावला बँकेबाहेर वाद
जळगावात शुक्रवारी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत दोन - दोन खातेदारांना आत सोडण्यात येत असल्यावरून ग्राहक आणि कर्मचाºयांमध्ये वाद झाला. ग्राहकाने संतापात पासबुकच फाडून टाकले.

महाबळेश्वरात पर्यटकांना आजपासून प्रवेश बंद
सातारा : विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांबरोबर चर्चा करून नगरपालिकेने शुक्रवारपासून पर्यटकांसाठी महाबळेश्वर बंद केले आहे. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांना शहरात प्रवेश न देता नाक्यावरूनच परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली आहे. बैठकीतील निर्णयानुसार शहरातील सर्व व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद केली असून, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

साहित्य खरेदीसाठी कायद्यात दुरुस्ती करणार : बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर डीपीसीअंतर्गत सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या निधीतून वैद्यकीय सुविधांसाठी साहित्य तथा यंत्रसामुग्री खरेदी करण्यासासाठी प्रचलीत नियमानुसार विलंब होण्याची अडचण पाहता याबाबत वित्त सचिवांशी चर्चा करून दीड ते दोन दिवसांत ही खरेदी करण्यासाठी तरतूद करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

फ्रान्सहून आलेल्या तरुणाची तपासणी : लातूर : दोन दिवसांपूर्वी फ्रान्सहून मुरुड येथे एक युवक आल्याने नागरिकांत भीती पसरली़ ही माहिती आरोग्य व पोलीस प्रशासनास मिळाल्यानंतर शुक्रवारी पोलीस पथक घराकडे गेले असता त्याने आरोग्य तपासणीसाठी तयारी दर्शविली़ त्याचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत स्वॅब घेण्यात येऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हापुरात शुक्रवारची नमाज घरातूनच अदा
कोल्हापूर : केवळ पाच ते सहाजणांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरांमध्ये शुक्रवारची महत्त्वाची नमाज दुपारी दीड वाजता अदा केली. शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाºया २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरुवारी २००९ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये ७२१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

अमेरिका रिटर्न नवरदेवासह नवरी सक्तीने एकांतवासात
यवतमाळ : अमेरिकेतून येऊन जिल्हा प्रशासनाला सूचना न देता यवतमाळात लग्न करणाºया एका वरासह वधूला शुक्रवारी आरोग्य यंत्रणेने क्वारंटाईन केले. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणखी कठोर करण्यात आल्या आहेत. सील केलेल्या तेलंगणा सीमेवर प्रवाशांची तपासणी कशी सुरू आहे, याची शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी स्वत: पाहणी केली. जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना संशयितांची संख्या १३० झाली आहे. विलगीकरण कक्षातील दोघांची सुटका झाली असली तरी त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

उपचारासाठी दाखल न होणा-या डॉक्टरविरोधात गुन्हा
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील तपासणीत एक महिला डॉक्टर कोरोना संशयित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्यांनी आंतररुग्ण म्हणून दाखल होण्याची तोंडी हमी देऊनही विलगीकरण कक्षात दाखल होणे टाळले होते. अन्य लोकांच्या जीविताला धोका पोहोचेल अशी कृती केल्यामुळे या महिला डॉक्टरवर पोलीस स्थानकात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिला डॉक्टरला पोलिसांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहराजवळच स्वतंत्र ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित महिला डॉक्टर या कोरोना संशयित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे आलेल्या होत्या. त्यावेळी डॉ. प्रकाश जांभुळकर यांनी त्यांची तपासणी करून बाह्यरुग्ण पत्रिकेवर कोरोना संशयित विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात दाखल व्हावे, असे नमूद केले होते. विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्याची तोंडी हमी या महिला डॉक्टरने दिली होती. तसेच डॉ. प्रकाश जांभुळकर यांनी सांगितल्यानुसार डॉ. एस. के. फुले यांनी त्यांचा थ्रोट स्वॅब घेतलेला आहे.
मात्र त्यानंतरही आरोपी महिला डॉक्टर या विलगीकरण कक्षात दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली.

तक्रार देऊन बाजारात गेल्या
रत्नागिरीतील कोरोनाबाधित रूग्णाची तपासणी या महिला डॉक्टरने केली होती. त्यामुळे त्या संशयित म्हणून स्वत:हून पुढे आल्या. मात्र कक्षात दाखल होण्याऐवजी त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेल्या. तेथून त्या बाजारात गेल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Coronavirus : effort in state to control Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.