Coronavirus : राज्यातील तुरुंगात असलेल्या ‘कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:16 AM2020-03-18T06:16:30+5:302020-03-18T06:16:48+5:30
सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे. परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत. त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़
पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांपर्यंत पोहचू नये, यासाठी राज्यातील कारागृहात विशेष प्रयत्न केले जात आहे. कारागृहात सध्या क्षमतेच्या १५२ टक्के कैद्यांची संख्या आहे़ ती कमी करण्यासाठी किरकोळ कारणासाठी कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचे कारागृहाचे प्रमुख सनील रामानंद यांनी सांगितले.
रामानंद यांनी सांगितले, की सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे़ परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत़ त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़ त्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ४ मध्यवर्ती कारागृहात जवळपास ४५ टक्के कैदी आहेत़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांमध्ये होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेत आहोत़ कैद्यांना प्रत्यक्ष कोर्टात नेण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत करण्याचा प्रयत्न आहे़