coronavirus: भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:26 PM2020-05-22T14:26:32+5:302020-05-22T14:26:38+5:30
सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
जळगाव - कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपाने आज उद्धव ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी कुटुंबीयांसह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षाताई खडसे यासुद्धा उपस्थित होत्या. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, असा टोला खडसे यांनी यावेळी बॅनरच्या माध्यमातून लगावला.
खासदार रक्षाताई खडसे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र घरात, अशी टीका त्यांनी केली आहे. खडसे आज या आंदोलनात सहभागी झाल्याने पक्षावर नाराज असले तरी ते पक्षासोबत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मेरा आंगण... मेरा रणांगण
— Raksha Khadse (@khadseraksha) May 22, 2020
"उद्धवा... अजब तुझे निष्फळ सरकार"
महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात...
उद्धव सरकार मात्र आपल्या घरात...!#MaharashtraBachao#महाराष्ट्र_बचाव_आंदोलनpic.twitter.com/fawvuTaGJM
दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे.
राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.