Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:36 PM2020-03-14T23:36:27+5:302020-03-15T06:44:54+5:30

Corona virus News: पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.

Coronavirus: Five new Corona patients found in Pimpri-Chinchwad BKP | Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर

Next

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची   संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आज दिवस अखेर राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आज दिवसभरातर कोरोनाच्या 14 रुग्णांची नोंद झाली. पैकी पाच नवे रुग्ण  पिंपरी-चिंचवड या भागात आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली. 

पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉसझिटिव्ह आले आहेत.  कोरोना बाधित देशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या 31 जणांची माहिती प्रशासनाकडे आहे. या लोकांच्या कुटुंबातील आणखी संशयित 41 जणांचे नमुने एनआयव्ही कडे शुक्रवारी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट शनिवारी रात्री पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली असून, संबंधित रुग्णांना भोसरी येथील रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आज आढळलेल्या कोरोनाच्या 14 रुग्णांपैकी 4 जण हे  पुणे येथील पहिल्या 2 बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी 1 रुग्ण अहमदनगरला, 2 यवतमाळला तर 1 जण मुंबईतील रुग्णालयात भरती आहे. तसेच, या चौघांशिवाय मुंबईत आणखी  4 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबईहून आलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर, मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून भारतात परतलेले आहेत. तर रात्री उशिरा पिंपरी चिंचवडमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  

दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आहे. मात्र, यादरम्यान दहावीची परीक्षा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 


मध्यरात्रीपासून सर्व प्रवासी क्वारंटाईन
केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून भारतात येतील, त्यांना १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा एकूण चार प्रवाशांना काल क्वारंटाईन करण्यात आले. यापैकी एकाला पुण्यात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून, इतर तिघांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,४९४ विमानांमधील १,७३,२४७ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ९४९ पैकी ४०९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

राज्यात १३१ संशयित रुग्ण भरती
राज्यात शनिवारी १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या १७ जण पुणे येथे, तर ७२ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नऊ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे तीन संशयित रुग्ण भरती आहेत.

‘आयआयटी’चे वर्ग २९ मार्चपर्यंत बंद
आयआयटी मुंबईमधील सर्व वर्ग, सेंट्रल लायब्ररी आणि प्रयोगशाळा या २९ मार्च २०२० पर्यंत आयआयटी प्रशासनाकडून पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

चेंबूर, घाटकोपर येथील मॉलबाहेर शुकशुकाट
कोरानामुळे मुंबईतील पूर्व उपनगरातील अनेक मॉल्सबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला. चेंबूरमधील के स्टार मॉल, क्युबिक मॉल आणि घाटकोपरमधील फिनिक्स, आर सिटी मॉल या नेहमी गजबजलेल्या मॉलमध्येही शनिवारी शुकशुकाट होता. अनेक रेस्टॉरंट, मैदाने, गार्डनबाहेरही शुकशुकाट होता.

Web Title: Coronavirus: Five new Corona patients found in Pimpri-Chinchwad BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.