CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:58 PM2021-04-29T21:58:38+5:302021-04-29T21:59:56+5:30
CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना कहर महाराष्ट्रासह देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांची नात ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी दिली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर हे सध्या नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, त्यांची तब्येत उत्तम आहे. कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. वयोमान लक्षात घेता अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयात भरती केले असल्याचे ॲड. रुद्राली यांनी सांगितले.
महाराष्ट्रात १५ मे पर्यंत कडक निर्बंधाची घोषणा; काय सुरू अन् काय बंद राहणार? जाणून घ्या
राज्यात ६६ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वरच दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे ६८,५३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७०,३०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.६९ टक्क्यांवर आला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारनं प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून प्रसार रोखण्यासाठी आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारकडून जीआर काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.