CoronaVirus : निर्बंधातून स्वातंत्र्य, राज्यातील अनेक शहरे घेणार मोकळा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:53 AM2021-08-15T09:53:17+5:302021-08-15T09:54:03+5:30

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळूनच हे स्वातंत्र्य उपभोगावे, अन्यथा पुन्हा नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

CoronaVirus : Freedom from restrictions, many cities in the state will breathe a sigh of relief | CoronaVirus : निर्बंधातून स्वातंत्र्य, राज्यातील अनेक शहरे घेणार मोकळा श्वास 

CoronaVirus : निर्बंधातून स्वातंत्र्य, राज्यातील अनेक शहरे घेणार मोकळा श्वास 

Next

मुंबई : आज १५ ऑगस्टपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरे कोरोनाच्या निर्बंधांतून स्वतंत्र होत मोकळा श्वास घेणार आहेत. लसीचे दोनही डोस घेतलेल्यांना मॉल्ससह गर्दीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. हॉटेलिंगची मजाही चाखता येईल. दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबईत लोकलदेखील खुली होत आहे. एकूणच निर्बंधामुळे स्लो ट्रॅकवर गेलेले आयुष्य यामुळे पुन्हा फास्ट ट्रॅकवर येत आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळूनच हे स्वातंत्र्य उपभोगावे, अन्यथा पुन्हा नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

रविवारपासून दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद असतील. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्स खुले होणार असून, कोरोनाचे नियम पाळत येथे अधिकाधिक स्वच्छता राखली जाणार आहे. हॉटेल्सदेखील आता खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, अधिकाधिक स्वच्छता पाळण्यावर भर दिला जाणार आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्यांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील. 

जळगावात आढळले सर्वाधिक रुग्ण 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे, पुणे प्रत्येकी ६, पालघर आणि रायगड प्रत्येकी ३, नांदेड, गोंदिया प्रत्येकी २ आणि चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

‘डेल्टा प्लस’चा धोका अजूनही कायम 
- निर्बंधातून सूट मिळाली असली तरी राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूने चिंता वाढविली आहे. शनिवारी पुणे शहरात पहिला रुग्ण आढळून आला. यामुळे राज्यातील एकूण ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. 
- पुण्यातील संबंधित ६२ वर्षीय रुग्णाचा अहवाल शनिवारी महापालिकेकडे आला असला तरी, त्याला विषाणूची बाधा एक महिन्यापूर्वीच झाली असून तो आता कोरोनामुक्त झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची कोरोना तापसणी करण्यात आली असून, यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़. 

मास्क मात्र अनिवार्य 
खुली अथवा बंदिस्त उपाहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. उपाहारगृहामध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण 
मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहणार आहे. 
प्रसाधनगृहात उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असावा. शारीरिक अंतरानुसारच आसन व्यवस्था करण्यात येईल.
भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा आहे. 
शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे लसीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत. 
वातानुकूलित, विना वातानुकूलित जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री 
१० पर्यंत सुरू राहतील. मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील.

- दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबईत लोकल खुली होत आहे. निर्बंधामुळे स्लो ट्रॅकवर गेलेले आयुष्य पुन्हा फास्ट ट्रॅकवर येत आहे. 

Web Title: CoronaVirus : Freedom from restrictions, many cities in the state will breathe a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.