CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:45 AM2020-04-10T06:45:54+5:302020-04-10T06:46:06+5:30

बाजार समितीचा निर्णय : धान्य बाजार मात्र सुरू

CoronaVirus Fruit market with onion-vegetable closed from tomorrow | CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद

CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा, भाजीसह फळ मार्केट ११ एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्यांना मात्र परवानगी आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.


बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाºयास कोरोनाची लागण झाल्यामुळे माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाऊक व्यापारी भाजीपाला महासंघ, फळ बाजार आवारातील फ्रंट आॅफ युनायटेड फ्रुट्स असोसिएशन, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ या व्यापारी संघटनांनी मार्केट बंद ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते. यात कांदा-बटाटा,
भाजीपाला व फळ मार्केट ११ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.


भाजीपाला व फळ मार्केट बंद राहणार असले तरी शेतकरी ते ग्राहक ही योजना सुरूच राहणार आहे. योजनेअंतर्गत प्रतिदिन २५० ते ३०० टेम्पोंमधून भाजीपाला मुंबईत पाठविण्यात येत आहे. यापुढेही तो पाठविण्यात येणार आहे. फळे व कांदा-बटाटाही थेट पाठविण्यात येणार आहे.


पुण्यातील मार्केट यार्ड बंद
1पुणे शहरातील मार्केट यार्ड शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशन तसेच कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटना यांनी घेतला आहे़
2कृषी उत्पन्न बाजार समितीने १० एप्रिलपासून मार्केट यार्डातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ फक्त भुसार बाजार सुरू राहणार आहे़ श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे़
3जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे़

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला, फळ व कांदा मार्केट बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार तीनही मार्केट ११ एप्रिलपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्याची योजना सुरू राहणार असून धान्य मार्केट सुरू राहणार आहे.
- अनिल चव्हाण,
सचिव, मुंबई बाजार समिती

Web Title: CoronaVirus Fruit market with onion-vegetable closed from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.