Coronavirus: जिनोव्हाच्या कोरोना लसीची चाचणी वर्षाखेरीस; पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 07:36 AM2020-12-01T07:36:09+5:302020-12-01T07:36:22+5:30
अमेरिकेतील सिअॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे.
पुणे : जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून कोरोनावर देशातील पहिली ‘एमआरएनए’वर आधारीत ‘एजीसी०१९’ ही लस विकसित केली जात आहे. वर्षअखेरीस या लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या लसीची २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करता यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लस प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे वितरण आणि साठवणूक शक्य होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासह वितरण, चाचण्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. तर, सोमवारी जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून तयार केल्या जात असलेल्या लसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माहिती घेतली.
अमेरिकेतील सिअॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे. हिंजवडीतील कंपनीच्या प्रयोगशाळेस शंभर देशांतील राजदुतांच्या भेटीचे नियोजनही सुरू आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जिनोव्हाकडून वेगाने काम सुरू असून या लसीच्या मानवी चाचण्यांना वर्षअखेरीस सुरुवात होणार आहे. लवकर मान्यता मिळाल्यास त्याआधीही सुरुवात होऊ शकते.
भारतात विकसित होणाऱ्या बहुतेक लसी विषाणुतील प्रोटीन्सचा आधार असलेल्या आहेत. जिनोव्हाची लस ‘एमआरएनए’ वर आधारलेली आहे. या पध्दतीमुळे लस बनविण्याचा कालावधी अत्यंत कमी होऊ शकतो. त्याचे उत्पादनही वेगाने करता येऊ शकतो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ‘ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यान साठविता येऊ शकते. त्यादृष्टीने सुरुवातीपासूनच वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाच्या या लसीच्या चाचण्यांना केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने निधी दिला आहे. मानवी चाचण्यांना मान्यतेसाठी भारतीय नियामक संस्थेकडे परवानगी मागितली आहे. या चाचण्या मार्चपर्यंत पूर्ण होतील. ‘एमआरएनए’वर आधारलेल्या लसीच्या भारतातील या पहिल्या मानवी चाचण्या असतील.’ अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.