Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:48 PM2020-03-19T12:48:34+5:302020-03-19T13:06:07+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई : कोरोना व्हायरस हा अद्याप आटोक्यात असून आपण एक जागतिक युद्ध लढत आहोत. सरकारी यंत्रणा जिवाची पर्वा न करता लढतेय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा व्हायरस पसरू नये यासाठी राज्यातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. सध्यातरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लागण झालेली आहे. यामुळे ही साथ आटोक्यात आहे. सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. या युद्धात तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे सरकारचं बळ आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजेच यंत्रणा सज्ज आहे. यंत्र आणि यंत्रणा यातील फरक लक्षात घ्यावा. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. घाबरून युद्ध लढता येत नाही. जिद्दीनेच लढावं लागतं, असा संदेश ठाकरे यांनी दिला.
याचबरोबर त्य़ांनी सावधही केले आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. जवान लढतात, धारातिर्थी पडतात. ६५ आणि ७१ सालचं युद्ध अनुभवलंय. सायरन वाजला की पळापळ व्हायची. घराघरातील दिवे बंद व्हायचे. ते कुणाला आवडत नव्हतं. पण शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये म्हणून तशा सूचना दिलेल्या होत्या, असा अनुभवही त्यांनी मांडला. तशाच प्रकारचे हे विषाणूंशी युद्ध आहे.
युद्ध सुरू झालंय, सायरन वाजलाय, सगळ्या यंत्रणा लढत आहेत. आम्ही ज्या सूचना देतोय त्या पाळा. घरदार कुटुंब, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
गर्दी टाळण्यासाठी आवाहन करताना त्यांनी मंदिरं, मशिदी, दर्गे येथील दर्शनं बंद केली आहेत. जत्रा, यात्रा, कार्यक्रम रद्द केले आहेत. ट्रेनची गर्दी ओसरली, बसची गर्दी ओसरली ही चांगली बाब आहे. पण गर्दी आणखी कमी झाली पाहिजे. कोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी घ्यावीच लागणार आहे. पंतप्रधान मोदींशी बोललो असून केंद्र सरकारसुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरले आहे, असे सांगतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाला अपराध्याची वागणूक न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.