CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:18 PM2020-05-17T13:18:31+5:302020-05-17T13:56:48+5:30
CoronaVirus News: रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्यानं उद्धव ठाकरे सरकारनं लॉकडाऊन वाढवला
Next
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Government of Maharashtra extends lockdown till May 31 for containment of COVID19. pic.twitter.com/qjJOfEj6o0
— ANI (@ANI) May 17, 2020
राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी पत्राद्वारे सर्व विभागांना कळवलं आहे. 'राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असेल,' असं अजॉय मेहता यांनी पत्रात म्हटलं आहे. काल राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार ६०६ नं वाढला. कोरोना रुग्णांची संख्या एकाच दिवशी झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे राज्यातल्या बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज रात्री संपणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...
आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा