Coronavirus: कोरोना संशयित 'होम क्वॉरेंटाईन'मधून बाहेर पडल्यास काय? प्रशासनाचा 'प्लान' तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:05 PM2020-03-16T19:05:06+5:302020-03-16T19:10:38+5:30
अनेकांकडून होम क्वॉरेंटाईनचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी; शासन करणार कठोर कारवाई
वर्धा: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आज जिल्हा प्रशासनाला कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेल्या 45 व्यक्तींची यादी प्राप्त झाली आहे. या 45 व्यक्तींना आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथून आलेल्या 6 विद्यार्थ्यांना 14 दिवसांसाठी त्यांच्या घरीच वेगळे (होम क्वॉरेंटाईन) ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हातावर विशिष्ट शिक्का मारण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना आता 24 तासांसाठी विमानतळावर उतरलेल्या शहरातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हातावर विशिष्ट प्रकारचा शिक्का मारला जाणार आहे. त्याचबरोबर मागील महिनाभरात कोराना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींची यादीसुद्धा जिल्ह्याला पाठवण्यात येत आहे. केंद्र शासनाने चीन, जर्मनी, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि स्पेन या देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये राज्य शासनाने आणखी तीन देशांचा समावेश केला आहे. राज्य शासन आता दुबई, सौदी अरेबिया, आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांचीसुद्धा तपासणी करून त्यांना 14 दिवस घरीच निरीक्षणाखाली ठेवत आहे.
कोरोनाबाधित देशात प्रवास करून आलेल्या जिल्ह्यातील 45 नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. तसेच कलबुर्गी येथून जिल्ह्यातील 6 विद्यार्थी परत आले आहेत. या व्यक्ती विविध तालुक्यातील आहेत. या व्यक्तींना त्या-त्या तालुक्यातील नियुक्त अधिकारी, कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना घरीच 14 दिवस वेगळ्या खोलीत ठेवण्यासाठी कुटुंबीयांना समजावून सांगतील. तसेच त्यांच्या हातावर कोणत्या तारखेपर्यंत त्यांना घरी अलग राहावे लागेल याची तारीख शिक्का मारून नमूद करतील.
नागरिकांनी न ऐकल्यास सक्तीची उपाययोजना
प्रशासनाच्या असे लक्षात आले की, घरी क्वांरटाईन म्हणून राहायला सांगितलेल्या व्यक्तींनी शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे यापुढे अशा व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास जनतेने याची माहिती प्रशासनाला द्यावी. त्यांना सक्तीने शासनाने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. अशा व्यक्तींवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. यासाठी एक सुव्यवस्थित यंत्रणा तयार केली आहे. प्रत्येक गावात आणि शहरात प्रभागनिहाय नोडल कर्मचारी, पर्यवेक्षक आणि तालुका वैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्ती आढळतील, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव होणार नाही यासाठी प्रशासन जनजागृती सोबतच सक्तीची उपाययोजना अमलात आणणार आहे.
शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत
प्रशासनाने काल जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, बंद ठेवण्याचे आदेश काढलेत. मात्र काही शाळा आज सुरू असल्याचे लक्षात आले. अशा शाळा, महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी तातडीने प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अन्यथा अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. मात्र त्याचवेळी शिक्षक, प्राध्यापकांनी शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहायचे आहे. त्यांच्या सेवा कधीही प्रशासन कोरोना उपाययोजनेसाठी घेऊ शकते. तसेच त्यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
ठिकठिकाणी हात धुण्याची व्यवस्था
जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र, सामुहिक सेवा केंद्र, इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा केंद्र, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे हात धुण्याची व्यवस्था करून दिली आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शक्यतोवर स्वतःच्या घरीच राहावे. स्वच्छतेची काळजी घ्यावी. जेणेकरून आपला जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही.