Coronavirus: लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचं आरोग्य विभागासमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:05 AM2021-01-25T03:05:53+5:302021-01-25T03:06:05+5:30
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
अकोला : राज्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाची उत्साहात सुरुवात झाली. मात्र, दुसऱ्या दिवसापासून लसीकरणाच्या टक्क्यात घसरण झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत संपणे अपेक्षित आहे. मात्र, लसीकरणाची सध्याची टक्केवारी पाहता १४ फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा संपविण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील काही लाभार्थ्यांना लस घेतल्यानंतर रिॲक्शन झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. मोहिमेच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यातील विविध जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. लसीकरणाची टक्केवारी कमी असताना निर्धारित वेळेवर कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.
एका केंद्रावर १०० लाभार्थींची मर्यादा रद्द
कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका केंद्रावर १०० लाभार्थींना लसीकरणाची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा रद्द करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता उपलब्ध मनुष्यबळानुसार, एका केंद्रावर १०० पेक्षा जास्त लाभार्थींना लसीकरण करणे शक्य होणार आहे.
कोविड लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानुसार, लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरासोबतच ग्रामीण भागातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला