coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 09:37 PM2020-04-06T21:37:21+5:302020-04-06T21:39:29+5:30
14 एप्रिलला लॉकडाऊन संपून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली आहे.
मुंबई - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता 14 एप्रिलला लॉकडाऊन संपून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली आहे. मात्र राज्याचे अयोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊनबाबत मोठे संकेत दिले आहेत.
15 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे शिथिल होतील असे कुणी गृहीत धरू नये, असे विधान राजेश टोपे यांनी केले आहे. लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू होईल, असे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील रुग्णांची संख्या पाहून लॉकडाऊन संपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे विधान, राजेश टोपे यांनी काल केले होते.
दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, नऊ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
या साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली तर राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरिता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.