coronavirus: आरोग्यसेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर सेवांची मदत घेणार - राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:57 PM2020-05-07T19:57:51+5:302020-05-07T20:02:23+5:30
राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
मुंबई - देशात कोरोनाबाधित रुग्णांचा संसर्ग वेगाने वाढत असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या फैलावाने गंभीर रूप घेतले आहे. त्यातच राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात आरोग्यसेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर सेवांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच बीकेसी, रेसकोर्स, गोरेगावात कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबूक लाइ्व्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईत दोन हजार अतिरिक्त बेड उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास त्यावर उपचार करण्यासाठी बीकेसी, रेसकोर्स, गोरेगावात रुग्णालय उभारण्याची तयारी आम्ही केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आरोग्यसेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर सेवांची मदत घेणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. चाचण्या अधिक झाल्यामुळे रुग्ण अधिक सापडले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच क्वारेंटाइनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींचा क्वारेंटाइन कालावधी कमी करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झाला असेल किंवा तशी लक्षणे दिसत असतील, तर अशी माहिती लपवू नका असे आवाहनही टोपे यांनी केले.