CoronaVirus: मरकजला परवानगी कशी दिली?; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुन्हा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 02:25 PM2020-04-09T14:25:44+5:302020-04-09T14:30:00+5:30
Coronavirus मरकजवरुन अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल
मुंबई: तबलिगी जमातच्या निझामुद्दीनमधील मरकजवरुन पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला. तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं खुद्द केंद्राचं आरोग्य मंत्रालय सांगतंय. दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानशी कशी दिली? त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी अमित शहांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकजमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानंच याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात होणारा तबलिगी जमातचा कार्यक्रम पोलिसांनी रोखला. मग दिल्ली पोलिसांना ते पाऊल का उचलता आलं नाही? त्यांना कार्यक्रमाला परवानगी कशी दिली? मग या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले. दिल्लीतले पोलीस केंद्राच्या अखत्यारित येत असल्यानं देशमुख यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे केंद्र सरकारला प्रश्न? pic.twitter.com/wpSRqq8umy
— Lokmat (@MiLOKMAT) April 8, 2020
विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी कालच एका पत्राद्वारे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य केलं होतं. त्यांनी पत्रातून काही प्रश्न विचारत अजित डोवाल यांच्यावरच शंका उपस्थित केली होती. मुंबईतील वसई येथे १५ आणि १६ एप्रिल रोजी जवळपास ५० हजार तबलिगी एकत्र जमणार होते. मात्र, राज्य सरकार आणि गृहविभागाने परवानगी नाकारली. मग केंद्र सरकारनं दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी कशी दिली? असा प्रश्न देशमुख यांनी विचारला होता.
राज्यात आणि देशात जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा सवाल देशमुख यांनी पत्रातून उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या विषयावर बोलायचं का टाळलं ? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौलाना कुठं गायब झाले, मौलाना आता कुठं आहेत? असे प्रश्न विचारत, तबलिगीशी संबंध तुमचे! असा प्रश्नार्थक आरोपही देशमुख यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयावर केला आहे.