Coronavirus: 'त्या' रुग्णांवर यापुढे थेट पोलिसी कारवाई होणार; गृहमंत्र्यांचे स्पष्ट आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:04 PM2020-03-19T16:04:11+5:302020-03-19T16:12:03+5:30
Coronavirus गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश; रुग्णालयातून पळणाऱ्या रुग्णांवर कारवाई होणार
मुंबई: कोरोनाची लागण रोखण्यासाठी एकीकडे सरकार, प्रशासन कामाला लागलं असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण मात्र रुग्णालयातून पळून जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांनी कॉरेंटाईन होणं गरजेचं असताना उलट हे रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट अशा रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कोरोना विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्या रुग्णांवर पोलिसांकडून थेट कारवाई होणार आहे.
रुग्णांनी कोरोना विलगीकरण केंद्रातून पळ काढल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांवरील उपचार थांबून त्यांचा जीव धोक्यात येत आहेच. याशिवाय त्यांच्या पळून जाण्यानं शेकडो लोकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोकादेखील निर्माण होत आहेत. त्यामुळेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा रुग्णांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनी दिले आहेत. त्यांनी ट्विटमधून याबद्दलची माहिती दिलीय. 'वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला 'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे', असं देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2020
'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे.#WarOnCorona
कोरोना विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून गेल्याच्या घटना आतापर्यंत नागपूर, पुणे, अहमदनगर यासह काही भागांमध्ये घडल्या आहेत. रुग्ण पळून गेल्यानं रुग्णालय प्रशासनाची आणि पोलिसांची तारांबळ उडते. या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा संस्रग होण्याची भीती असते. त्यामुळेच आता अशा रुग्णांवर थेट पोलिसी कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश गृहमंत्र्यांकडून पोलिसांना देण्यात आले आहेत.