CoronaVirus News: उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 01:48 PM2020-05-31T13:48:14+5:302020-05-31T13:52:21+5:30
CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोरोना संकटातील कामगिरीवर, नारायण राणेंच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर शहांचं भाष्य
नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा पावणे दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यातील ६५ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना संकटाला तोंड देण्यात राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कमी पडत असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या. भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं आहे.
देशातल्या प्रत्येक राज्यानं कोरोनाविरुद्ध संघर्ष केला आहे आणि अजूनही संघर्ष सुरूच आहे. या लढाईकडे आकड्याच्या दृष्टीकोनातून पाहायला नको. हे राज्य अपयशी ठरलं, ते यशस्वी झालं, असं आकडेवारी पाहून ठरवायला नको. ही लढाई प्रत्येकाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, देशातील जनता सगळेच जण ही लढाई लढत आहेत. ज्याला हे शक्य होतं, त्यानं ते आपल्या परीनं उत्तम प्रकारे केलं आहे, असं अमित शहा म्हणाले. ते 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
महाराष्ट्रात भाजपा खासदार नारायण राणेंनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर अमित शहांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं. 'ती त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपाची मागणी नाही. प्रत्येक राज्यानं त्यांना शक्य होतं, तितकं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला आहे,' असं शहा म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासकीय अनुभव कमी पडतोय का, असा प्रश्नदेखील अमित शहांना विचारण्यात आला. त्यावर मी या प्रकारचं कोणतंही भाष्य करणार नाही. प्रत्येक राज्यातल्या सरकारनं, तिथल्या प्रशासनानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम केलं आहे, असं उत्तर शहांनी दिलं.
राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर वारंवार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली आहे. खासदार नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मुंबई लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.
"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"
देश अनलॉक होऊ लागलाय, आता अधिक सावध राहण्याची गरज - नरेंद्र मोदी
हॉलीवूडपासून हरिद्वारपर्यंत योग, आयुर्वेदाची चर्चा, कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी विषद केलं महत्त्व