CoronaVirus: वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती रुग्णालयाने सोपवला मृत्यू दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:12 AM2020-08-11T08:12:39+5:302020-08-11T08:14:13+5:30
सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार; सकाळी कर्मचाऱ्याने सांगितले होते वडिलांची प्नकृती ठीक
- प्रवीण खेते
अकोला : कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या वडिलांचा डबा घेऊन मुलगा रुग्णालयात जातो अन् त्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या मुलाच्या हाती चक्क मृत्यूचा दाखला देतात. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात घडला आहे, सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.
बुलडाणा जिल्ह्यातील सातगाव म्हसला गावातील ७० वर्षीय विठ्ठलसिंह जाधव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर बुलडाण्यातच उपचार सुरू करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचणी अहवालात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्यांना कोविड वार्ड क्रमांक २९ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा संदीप होता. संदीप हे वडिलांसाठी दररोज जेवणाचा डबाही घेऊन जात होते.
त्यांनी शनिवारी सकाळी वडिलांसाठी जेवणाचा डबा नेला. यावेळी कर्मचाºयाने वडिलांची प्नकृती ठीक असल्याचे सांगितले. त्याच दिवशी ते रात्रीचा डबा घेऊन गेले; मात्र त्यावेळी एका वैद्यकीय कर्मचाºयाने त्यांच्या हाती थेट मृत्यूचा दाखलाच दिला. त्यामुळे संदीप जाधव यांना धक्काच बसला.
रुग्णाच्या नातेवाइकांसोबत संपर्क होत नाही, त्या रुग्णाचा मृतदेह शवगृहात सुरक्षित आहे. नियमानुसार, त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीतच अकोल्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाईल.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.