CoronaVirus : 'नरेंद्र मोदी कोरोनाच्या संकटाबाबत किती गंभीर आहेत?', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:14 PM2020-04-03T14:14:00+5:302020-04-03T14:33:55+5:30
CoronaVirus : पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ आज सकाळी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला एकजूट ठेवण्याचे व रविवारी सायंकाळी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी घरोघर दिवे लावण्याचे आव्हान केले आहे.
अहमदनगर : कोरोनाशी लढण्यासाठी आज जनतेला मदत करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय साहित्य देखील हवे आहे. मात्र या सुविधा देण्याऐवजी पंतप्रधान जर लोकांना दिवे लावायला सांगत असतील तर ते स्वतः या संकटाबाबत किती गंभीर आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ आज सकाळी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला एकजूट ठेवण्याचे व रविवारी सायंकाळी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी घरोघर दिवे लावण्याचे आव्हान केले आहे. यावर बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पंतप्रधान कधी जनतेला टाळ्या वाजवल्या सांगतात, तर कधी दिवे लावायला सांगतात. मात्र आज देशाची गरज काय आहे, जनतेला काय सुविधा आवश्यक आहे, याचा ते विचार करणार आहेत का असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी म्हणाले की, ही लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे. पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. जनता ईश्वराचा अवतार असतो असे समजले जाते. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचे दर्शन वारंवार घडवून देत आहे. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोनाच्या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचे आहे. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे, नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
A video messsage to my fellow Indians. https://t.co/rcS97tTFrH
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2020
याचबरोबर, या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचे आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभे राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असे नरेंद्र मोदींनी सांगितले.