Coronavirus: मी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:38 PM2021-04-27T23:38:19+5:302021-04-27T23:39:16+5:30

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते.

Coronavirus: I lived my life ...; RSS Narayan Dabhadkar refused a bed for the young man | Coronavirus: मी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

Coronavirus: मी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले.दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला.

नागपूर : म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची नोंद झाली. असाच प्रसंग नागपुरात काल-परवा अनुभवास आला. स्वत: मृत्यूशय्येवर असतानाही दुसऱ्याच्या जगण्याची चिंता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड तरुणासाठी रिकामा केला आणि दुसऱ्याच दिवशी गतप्राण झाले.

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते. शिवाय, घरातील सगळीच मंडळी संक्रमित असल्याने अडथळ्यांचा पहाड होताच. अखेर २२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. ॲम्ब्युलन्समधून नारायणराव हॉस्पिटलला गेले. एक्स-रे काढल्यावर संक्रमण धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत उपचार सुरू झाले आणि खिडकीजवळचा बेड त्यांना मिळाला. बेडवर येत नाही तोच, त्यांना खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले. काही क्षण विचार केला आणि लागलीच जावयांना बोलावले. माझे वय ८५, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि मी माझे जगणे जगलो आहे. आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे. तेव्हा हा बेड रिकामा करतो आणि घरी जाऊ या... असे ते उच्चारले. घरी फोन केला तर सगळेच अचंबितही झाले. डॉक्टरांपुढे नारायणरावांची ही भावना व्यक्त केली तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, नारायणराव ऐकायला तयार नव्हते आणि मी बेड रिकामा करीत असल्याचे लिहून देत असल्याची घोषणा केली आणि लिहूनही दिले. ॲडमिट झाल्याच्या अवघ्या दोन तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला. घरी परतले. दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला. एखाद्या सिनेमातील साजेसा हा प्रसंग प्रत्यक्षात दाभाडकर कुटुंबात घडला. 

बाबा चिरंजीवी ठरले
बाबांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला तणाव देणारा होता. मात्र, त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून एक संस्कार दिला, याची जाणीव तत्क्षणी झाली आणि आम्ही त्यांच्या त्या निर्णयाचे स्वागत केले. खऱ्या अर्थाने बाबा चिरंजीवी ठरले. - आसावरी दाभाडकर कोठीवान

सध्याच्या स्थितीपुढे सगळ्याच यंत्रणा हतबल आहेत. नारायणराव यांना बेड मिळाला, उपचारही सुरू झाले होते. मात्र, त्यांना दिसलेल्या विदारक स्थितीत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बेड सोडला, ही या काळातील सर्वात मोठ्या औदार्याची वृत्ती आम्ही मानतो. नारायणराव जगू शकले नाही, ही खेदाची बाब. मात्र, आपल्या औदार्याने त्यांनी स्वतःचे नाव अमर केले. - डॉ. अजय हरदास, कोविड इंचार्ज, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधी नगर

Web Title: Coronavirus: I lived my life ...; RSS Narayan Dabhadkar refused a bed for the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.