coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण?
By बाळकृष्ण परब | Published: April 15, 2020 02:10 PM2020-04-15T14:10:19+5:302020-04-15T14:20:03+5:30
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार कधी केलाय का?
- बाळकृष्ण परब
एकीकडे राज्यात आणि देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस अधिकाधिक भयानक रूप घेत आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. विशेषतः फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर या आरो-प्रत्यारोपांनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या काही राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी ताजी असल्याने आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र आहे. कोरोनाविरोधातील लढाईत आपला नेताच कसे कुशल नेतृत्व करतोय आणि विरोधी नेता कसा अपयशी ठरतोय, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक आघाडीवर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे समाजात विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही आपल्या सोईप्रमाणे संबंधितांची तळी उचलत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना विषाणूमुळे भौतिक जग दूषित झाले असताना सोशल मीडियावरचे वैचारिक जगही परस्पर द्वेषाने प्रदूषित झाले आहे. अशा परिस्थितीत आपण, आपले राज्य आणि अंतिमतः आपला देश कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीविरोधातील लढाई कशी काय जिंकणार, हा यक्षप्रश्नच आहे.
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठीण परिस्थितीत राज्याची धुरा समर्थपणे वाहत आहेत. तर मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारही कोरोनाविरोधात युद्धपातळीवर तयारी करून सज्ज झाले आहे. राज्य, देशास संपूर्ण जगावर आलेल्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण योग्य तो समन्वय राखून असल्याचे सांगत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र एकमेकांचे सोशल मीडियावर परस्परांचे वाभाडे काढत आहेत. दावे, प्रतिदावे केले जात आहेत. प्रसंगी अनेक फेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो तो वेगळाच.
दुर्दैवाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी समाजातील विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र या मंडळींपैकी अनेकजणही सध्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांप्रमाणे हिसाबकिताब चुकते करण्यात गुंतले आहेत. कोरोनाविरोधात सुरू असलेली ही लढाई उद्धव ठाकरे हरावेत, असे यापैकी काही जणांना वाटते. तर कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरावेत, असे अनेकांना मनोमन वाटतेय.
पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार तुम्ही केलाय का? उद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल आणि या दोन्हींपैकी एकही गोष्ट आपल्याला अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे किमान हे संकट असेपर्यंत तरी आपापसातील मतभेद विसरा आणि एक राज्य, एक राष्ट्र म्हणून या संकटाचा सामना करा!!!