Coronavirus: लक्षणे नसतील, तर कोरोना टेस्ट नको; राज्य सरकारच्या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:21 AM2020-08-23T02:21:17+5:302020-08-23T07:37:33+5:30
कोट्यवधींचा खर्च तरी रुग्णसंख्येत वाढ, नव्या मार्गदर्शक सूचना
औरंगाबाद : कोरोनाची लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, व्यापाऱ्यांना लक्षणे नसतील, तर त्यांच्या चाचण्या करू नका, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी पाच महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला लाळेचे नमुने घेऊन चाचण्या केल्या जात होत्या. यात एका चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो, तर अहवाल चोवीस तासांनंतर मिळतो. दरम्यान, गेल्या महिन्यापासून अँटिजन पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. पाचशे रुपयांमध्ये असलेल्या कीटमुळे अहवाल अवघ्या वीस मिनिटांत मिळतो. त्यामुळे बाधित रुग्ण तातडीने समोर येतात, तसेच संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी लागणार खर्च कमी होतो.
संसर्ग रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात केंद्र शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश नुकतेच काढले होते. असे असतानाच शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाने नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यात लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले
आहेत.
राज्य शासनाच्या आदेशात काय?
- कोरोना टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांचीच अँटिजन चाचणी करण्यात यावी. त्यामुळे अर्ध्या तासात उपचारासंदर्भात निर्णय घेणे शक्य होईल.
- अँटिजनमध्ये निगेटिव्ह आलेले; पण लक्षणे असलेले नागरिक, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्कमध्ये असलेले व विदेशातून आलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी.
- रुग्णालयात येण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अत्यावश्यक शस्त्रक्रियेच्या रुग्णांची चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तिथे अँटिजन चाचणी करण्यात यावी.
- मनोरुग्णालयात दाखल होणाºया व्यक्तींना सुरुवातीला एक आठवडा क्वारंटाईन ठेवावे. त्यानंतर अँटिजन टेस्ट करावी.
- तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईन ठेवावे. त्यानंतर अँटिजन चाचणी करावी. चाचणीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घ्यावा.
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचण्या कराव्यात.