Coronavirus: पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:17 AM2021-11-29T07:17:15+5:302021-11-29T07:19:18+5:30
Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढणार असून प्रतिबंधाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढणार असून प्रतिबंधाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. पुन्हा एकदा संसर्गात वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे निर्धाराने नियम पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नव्या विषाणूची घातकता लक्षात घेता मुंबईसह सर्व जिल्हा प्रशासनांनी काळजी घ्यावी. विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने रविवारी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता आवश्यक निर्णय घेऊन पावले टाकावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्हणून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता
हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने पाहावे.
- परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे
- चाचण्या वाढवा, आवश्यक किटस् पुरवा
‘ओमिक्रॉनमुळे लसी निष्प्रभ होण्याची शक्यता’
ओमिक्रॉनची स्पाइक प्रोटिनमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा अधिक परिवर्तने झाली आहेत. या विषाणूमुळे लसी काही प्रमाणात निष्प्रभ होण्याची शक्यता असल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा तसेच विदेशी प्रवाशांच्या तपासणीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याच्या याआधी घेतलेल्या निर्णयाचा फेरआढावा घेण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने रविवारी घेतलेल्या बैठकीत ठरविण्यात आले.