CoronaVirus : अँटिजन टेस्ट किटच्या निर्यातीवर तत्काळ बंदी, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:48 AM2021-08-18T05:48:28+5:302021-08-18T05:49:13+5:30
CoronaVirus : ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सची निर्यात तत्काळ निर्बंध असलेल्या वर्गात ठेवण्यात आली आहे,’ असे विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले.
नवी दिल्ली : कोरोना लाटेच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सच्या निर्यातीवर तत्काळ निर्बंध लागू केले आहेत. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सची निर्यात तत्काळ निर्बंध असलेल्या वर्गात ठेवण्यात आली आहे,’ असे विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले. निर्बंध असलेल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी या विभागाचा परवाना किंवा परवानगी घ्यावी लागेल. हे निर्बंध या देशांतर्गत उपलब्धता वाढावी यासाठी आहेत.
२५,१६६ नवे रुग्ण
देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २५,१६६ रुग्ण आढळले, तर ४३७ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,३२,०७९ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५१ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. गेल्या १५४ दिवसांत प्रथमच एवढे कमी रुग्ण एका दिवसात नोंदले गेले. सक्रिय रुग्णांची संख्या ३,६९,८४६ असून बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१५ टक्के आहे, मे २०२० नंतर प्रथमच इतके कमी रुग्ण उपचार घेत आहेत.