CoronaVirus: ‘केंद्रीय पथकांच्या सूचना तातडीने अमलात आणा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:56 AM2020-04-24T04:56:47+5:302020-04-24T04:58:12+5:30
केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
मुंबई : राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य असून यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करीत आहे त्यावर समाधान व्यक्त केले. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक तीन दिवसांपासून मुंबईत आले आहे तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय पथक पुणे आणि परिसराचा दौरा करीत आहे.
पीपीई कीट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते. त्यामुळे आता अशी कीट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करणे महत्वाचे आहे. स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे कीट्स उत्पादित करीत आहेत मात्र केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की खासगी क्लिनिक्स, नर्सिंग होम्स मधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना आपल्या सुरक्षेची काळजी आहे हे मी समजू शकतो पण त्यांनी आपले दवाखाने उघडून इतर रुग्णांना सेवा दिली पाहिजे. सरकार त्यांना पीपीई कीट किंवा इतर सामुग्री उपलब्ध होताच निश्चितपणे पुरवेल.
या आहेत सूचना
संस्थात्मक क्वारंटाइन वाढविणे, अधिक फोकस्ड चाचण्या करणे, विशेषत: झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे, खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स सुरु करणे, अशा सूचना मनोज जोशी यांनी केल्या.
सध्या राज्यात रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी सुमारे ७ दिवसांचा आहे आणि तो १० दिवसांपेक्षा जास्त करण्याचे सध्या ठरविले आहे. मृत्यू झालेल्यांत ७८.९ टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार होते तसेच मरण पावलेले रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत असे लक्षात आले आहे.