Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:49 AM2020-03-24T05:49:01+5:302020-03-24T05:50:40+5:30
coronavirus : कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक घराबाहेर पडत आल्याने आणि सरकारच्या सूचनांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने आता ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ही घोषणा केली.
कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबईसह अनेक ठिकाणी रस्ते, दुकाने आदी ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, याचाही लोक विचार करताना दिसत नव्हते.
मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संचारबंदीचे आदेश काढा, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. हे आदेश तत्काळ अंमलात आले आहेत. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉक डाऊन आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवानाच मुभा असेल.
गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच, याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक सेवेमध्येच खासगी वाहने उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.
आदेशातील ठळक मुद्दे
- खासगी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त केवळ एकाच व्यक्तीला बसता येईल आणि तेही ही अत्यावश्यक सेवेसाठी.
- एसटी बसेस, मेट्रो रेल्वेही बंद राहणार आहे.
- खासगी व सरकारी आंतरराज्य बससेवा बंद
- सर्व दुकाने (व्यावसायिक आस्थापनेसह) कार्यालये, कारखाने, कार्यशाळा,गोदामे आदी बंद.
- डाळ व धान (भात) प्रक्रिया अन्न उत्पादनांचे कारखाने, डेअरी, जनावरांसाठीचे खाद्यान्न कारखाने सुरू
- बँका, एटीएम, विमा कंपन्यांची कार्यालये, गुगल पे सारख्या वित्तीय सेवा, टेलिकॉम, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सर्विसेस सुरू.
- अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा साखळ्या आणि त्यांची वाहतूक व्यवस्था सुरू राहील.
- दवाखाने औषधांची दुकाने चष्म्याची दुकाने सुरू.
- हॉटेलमध्ये बसून खाऊ शकणार नाही पण पार्सल घरी आणू शकता.
- पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, आॅईल एजन्सी सुरू
- पुढील आदेशापर्यंत सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे बंद.
- शासकीय व खासगी इस्पितळांमध्ये अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहे.