CoronaVirus: राज्यासह मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:56 AM2020-04-19T04:56:59+5:302020-04-19T06:52:31+5:30
३२८ नवे रुग्ण । एकूण ३ हजार ६९० बाधित
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णसंख्येचा वेग मंदावला असे सांगितले असले तरी आता शनिवारी दिवसभरात राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या वाढली आहे. शनिवारी राज्यात तब्बल ३२८ कोरोना रुग्णांचे निदान झाले, यातील एकट्या मुंबईत १८४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ हजार ६९० वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण २ हजार २६८ कोरोना रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात
झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१६ झाली आहे, तर मुंबईत ही संख्या १२६ इतकी आहे.
राज्यात शनिवारी ११ मृत्यूंची नोंद झाली. शनिवारी झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईतील ५ आणि पुणे येथील ४, तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष, तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत, तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ८२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
६३ हजार ४७६ जणांचे नमुने निगेटिव्ह
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका कार्यक्षेत्रात बाधितांची संख्या शनिवारी अनुक्रमे १५ आणि १३ ने वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६४ इतकी झाली आहे.