CoronaVirus News: राज्याच्या ग्रामीण-निमशहरी भागात संसर्ग अत्यल्प; मात्र प्रतिकारशक्ती कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:53 AM2020-06-17T03:53:07+5:302020-06-17T06:53:48+5:30
२४०० नागरिकांचे सर्वेक्षण : बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांचा समावेश
पुणे : पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) विकसित केलेल्या ‘इलायझा’ चाचणी किटद्वारे राज्यातील सहा जिल्ह्यांतील सुमारे २४०० जणांच्या केलेल्या तपासणीत केवळ एक टक्का लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणावरून राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागांत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच अद्याप लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
मानवी शरीरातील रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी ‘एनआयव्ही’कडून ‘इलायझा’ हे चाचणी किट मागील महिन्यात विकसित केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शरीरात अँटीबाडीज तयार होणे म्हणजे विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढलेली असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) ‘इलायझा’ किटचा वापर करून अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यापासून देशभरातील २१ राज्यांतील ६९ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव,
परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने विविध ठिकाणांनुसार १० समूहांची निवड करण्यात आली. प्रत्येक समूहामध्ये ४० जणांची अशी प्रत्येक जिल्ह्यात सुमारे ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.
सर्वेक्षणाचा उद्देश
कोरोनाचा संसर्ग झालेले परंतु लक्षणे नसलेले ७५ ते ८० टक्के रुग्ण आहेत. त्यांची कोरोना चाचणी केल्याशिवाय या व्यक्ती समोर येत नाहीत. याअनुषंगाने शरीरातील अँटीबॉडीजचा शोध घेऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार कितपत झाला आहे, संसर्ग झाला असेल तर अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का, प्रतिकारशक्ती वाढली आहे का, याचा अभ्यास करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.
सर्वेक्षणाचा निष्कर्ष : राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण २३८५ जणांच्या रक्तांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे आढळून आले. हे प्रमाण केवळ १.१३ टक्के एवढे आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँडीबॉडीज तयार झाल्या होत्या. यावरून राज्याच्या ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचा विषाणूचा प्रसार अत्यल्प प्रमाणात झालेला दिसून येते. याचा अर्थ संसर्ग कमी प्रमाणात झाला असल्याने लोकांमध्ये अद्याप कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही.
पुणे-मुंबईतही सर्वेक्षण
अँटीबॉडीचा शोध घेणारे हे सर्वेक्षण पुण्यासह मुंबई, ठाणे या शहरांमध्येही सुरू आहे.
या शहरांमधील विविध भागांतील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासले जात आहेत.
त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहे किंवा नाही, तसेच किती प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला आहे, हे समजणार आहे.
राज्यात या तीन शहरांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
रक्तामध्ये अँटीबॉडी तयार झाली असेल तर संबंधित व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, असे आपण म्हणतो. त्याअनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात आले. अँटीबॉडी तयार झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे, याचा अर्थ लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार झालेला दिसत नाही. पण त्याच वेळी प्रतिकारशक्तीही वाढलेली नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
- डॉ. प्रदीप आपटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग